Environment: Himalayas, Water And Many Other Things

Marathi मराठी

International Space Station एक बघणे !!!

This is how my humble mobile captured the International Space Station

Written on May 15, 2021

काल सकाळपासून कुणी अनंत जोशी, पुणे यांनी लिहिलेला एक माहितीपर लेख चार पाच WhatsApp समुहात मिळाला होता. हे जे कोणी जोशीबुवा आहेत, त्यांनी फारच मुद्देसूद माहिती दिली होती आणि रात्रीची ७.५८ ते ८.०५ अशी खूपच छोटी window असणार जेव्हा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, म्हणजेच International Space Station ही प्रचंड प्रयोगशाळा बिना दुर्बिणीची, साध्या डोळ्यांनी दिसेल असं पण लिहिलं होतं. नैऋत्येकडून ईशान्येकडे जाताना, ठळक चांदणी सारखे दिसेल हे ही कळलं.

मागच्या वर्षी लॉकडाऊन दरम्यानच स्टारलिंक – म्हणजे दोन डझनहून जास्ती उपग्रहांची माळा एप्रिल मध्ये पाहिलेली आठवली. आणि ठरवलं, अनायसे नागपूरला आहोत, एकूणच सगळ्या प्रकारचं प्रदूषण कमी आहे तर नक्की गच्चीत जाऊन बघू.

संध्याकाळपर्यंत अजून दोन समूहात जोशींची तीच पोस्ट मिळाली. त्यातल्या एका समुहात तर कहर म्हणजे या पोस्टच्या सोबत दोन इमेजेस पण मिळाल्यात ज्यामध्ये एक चक्क आठी दिशा दाखवणारे चित्र होते. त्यावर चर्चा ही झाली की ‘आजकाल हे पण सांगावं लागतं का?’ म्हणून. असो.

अनंत जोशींची पोस्ट चांगलीच वायरल झाली होती आणि ऐन संध्याकाळी पाउणे आठ वाजता पुन्हा एकदा बाबांच्या कुठल्यातरी समुहात पण आली. आणि त्यांनी नेमकी ७.५५ ला बघितली. ‘अगं, आपल्याला ते स्पेस स्टेशन बघायला जायचंय का?’ असं त्यांनी विचारलं. मी नेमकी जेवणाची पानं घेत होती. लक्षात आलं, अगदीच कमी वेळ उरलाय, पण चला पटकन जाऊ गच्चीत. कॅमेरात दिसेल की नाही शंका होतीच पण तो घेतला हातात आणि मी आणि बाबा गच्चीवर पोहोचलो. लहानपणी एकदा ‘हॅलेचा धुमकेतू’ अगदी सोनेगावला एका ओळखीच्यांच्या शेतावर जाऊन बघितला होता, त्याची आठवण झाली. वय वाढलं तरी एक्साईटमेंट तीच होती.

नमनाला घडाभर तेल घातलं म्हणाल, पण ही कहाणी याकरता की तो योग होता, स्पेस स्टेशन दिसण्याचा, चांगलच दिसण्याचा.

नागपूरला वायू प्रदूषण दिल्लीच्या तुलनेत नाहीच. आणि पाऊस पण दोन दिवसांपूर्वी पडून गेला होता. त्यामुळे स्वच्छ आकाश दिसत होतं आणि भरपूर चांदण्या आणि ईद का चांद पण. पण गेल्याच वर्षीची एक नवी ‘development’ आड येत होती. आमच्या भागाच्या नगरसेवकाने पूर्ण गल्लीत LED वाले नवे भगभग प्रकाश देणारे दिवे लावून घेतले होते. गल्लीकरता जरी ते फार कामाचं होतं, तरी आत्ता त्यांचा जरा जास्तीच उजेड होता आणि दुसऱ्या मजल्यावर आम्ही होतो तरी ambient light जाणवत होता. बाबा आणि मी नैऋत्येकडून ईशान्येकडे जाणाऱ्या मार्गावर ते स्पेस स्टेशन शोधात होतो.

अगदी ७.५८ ते ८.०५ अशी छोटीशीस वेळ होती, त्यामुळे काहीच न दिसल्यामुळे एक एक क्षण थांबणे म्हणजे ‘बापरे, आपल्याला उशीर तर नाही झाला?’ ‘आपल्याला दिसलं की नाही/दिसेल कि नाही?’ ‘चाललं तर नाही गेलं आपल्याकडून?’ असे प्रश्न दोघांना पडत होते आणि तरीही माना वर करून आकाशात इकडे तिकडे शोधणं सुरु होतं.

नैऋत्येकडून गल्लीतल्या दिव्याच्या उजेडाचा अडथळा होता, त्यामुळे ते अवकाश स्थानक जवळ जवळ ४५ अंश वर येईस्तोवर दिसलं नव्हतं. आणि अचानक, अगदीच जसा धुमकेतू अचानक प्रगटतो, तशी एक लखलखती चांदणी वेगाने जाताना दिसली. फुटबॉलच्या मैदाना इतकं मोठं ते, आम्हाला दिसताना इतर चांदण्यांच्या तुलनेत भरपूर मोठं आणि छानच दिसलं. अगदी डोक्यावर आलं ते तेव्हा तर सगळ्यात स्पष्ट दिसलं.

काही सेकंदांचा खेळ, तितक्यातच मोबाईलनी फोटो काढून बघा, कॅमेरात विडीओ काढून बघा आणि सोबतच प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा, असं सगळं सुरु होतं.

तितक्यात समोरच्या गच्चीवर एक लहान मुलगा, साधारण तीन वर्षांचा, आणि त्याचा बाबा आले आणि माझे बाबा excitement मध्ये त्या दोघांना पण बघा म्हणून सांगू लागले. मुळात International Space Station काय प्रकरण आहे हेच त्या पोराला माहिती नव्हतं, लहानगा तर बाळच होता. ‘भारताचा उपग्रह आहे का?’ म्हणून त्या शेजाऱ्याने विचारलं. मग बाबांनी त्यांचा पिच्छा सोडला आणि स्वतः पुन्हा त्या चांदणी-सारख्या अवकाश स्थानकाकडे बघायला लागले.

आणि बघता बघता तो तेजःपुंज ईशान्येकडे खाली खाली जाऊ लागला तसा अगदी बारीक होत होत चांदण्यांच्या गर्दीत नाहीसा झाला.

तर … मला दिसलेलं आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे असं: (जास्त झूम केलंय त्यामुळे आणि डोक्याच्यावर बिना stand चा कॅमेरा हातात धरलाय त्यामुळे इतकं हलतंय. Amateur attempt म्हणून बघावा हा प्रयत्न. फोटो तरी बराच बरा आहे.) 

धन्यवाद !!