Environment: Himalayas, Water And Many Other Things

Marathi मराठी

हाक लडाखची

मनाली-लेह रस्त्यावरच्या एका गावातल्या लडाखी महिला

वेळ आली आहे की लडाखी लोकांना ठरवावेच लागेल – मोजक्या चार महिन्यात पर्यटकांची भरमार आणि तेही जास्तीकरून लेह शहराच्या नैसर्गिक संसाधनांवर ताण देणारे पर्यटक हवेत की वर्षभर थोडे थोडे आणि तेही लडाखमध्ये सर्वत्र जाणारे पर्यटक हवेत 

लोसार हा लडाखी बौद्ध लोकांचा नव वर्षाचा सण. आपल्याकडे गुढी पाडव्याला महाराष्ट्रात असतात तसेच विविध कार्यक्रम, कौटुंबिक भेटी-गाठी, खरेदी आणि पारंपरिक खाद्य-पदार्थांची रेलचेल असा सगळा उत्साह संपूर्ण लडाखमध्ये असतो.

पण इतक्या छान पर्वाच्यावेळी दुर्दैवानी तिथे अगदी मोजके पर्यटक असतात, त्यातही विदेशी जास्ती. कारण हा सण लडाखच्या हिवाळ्यात, कधी डिसेंबर, कधी जानेवारीत येतो. सध्या लडाखला जितके पर्यटक जाताहेत त्यात तिथल्या उन्हाळ्यात, म्हणजेच जून ते सप्टेंबर पर्यंत, ९५% पर्यटक जातात. गेल्या साधारण २०-२५ वर्षात लडाखची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अगदी साधं उदाहरण. सरकारी आकडे सांगतात ऐंशीच्या दशकात जेमतेम दोन डझन हॉटेल असलेल्या लडाखमध्ये आज जवळजवळ सातशे लहान मोठी हॉटेल्स आहेत, ज्यात अगदी स्टार हॉटेल्स पासून साध्या गेस्ट हाउस पर्यंत आणि आजकाल खूपच लोकप्रिय होत चालेलेल्या होम-स्टे प्रकारची पण आहेत. यातली ६०-७०% हॉटेल्स एकट्या लेह, जी लडाखची राजधानी आहे, मध्ये आहेत.

उत्सवाच्या वेळी एकमेकांकडे असे पदार्थ, काही घरचे, काही विकतचे घेऊन जातात

आणि का नसावीत? पूर्ण भारतभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिथे जातात, त्यातले बहुतांश लेहमध्येच थांबून, लेह शहर, आसपासच्या जागा आणि दूर पँगाँग सरोवर बघून येतात. काही जण नुब्रा वॅलीला ही जातात. पण एकूणच सगळा भार लेह शहरावर आहे. त्या तीन-चार महिन्यात जवळ जवळ अडीच लाख पर्यटक लडाखला भेट देतात. (हा आकडा किती मोठा आहे हे समजायला लेह शहराची लोकसंख्या माहिती हवी. ती आहे फार फार तर ४०,०००. म्हणजे पहा, लोकसंख्येच्या जवळजवळ सहापट जास्ती पर्यटक येतात, त्या चार महिन्यात.

याचा नको तो ताण लेहच्या नैसर्गिक संसाधनांवर पडतो आहे. पारंपरिक पद्धतीनुसार सगळ्या लडाखी लोकांची पाण्याची आवश्यकता फारच कमी आहे. वाहते नळ ही तिकडे संकल्पनाच नव्हती. पण आता लेह शहरात हॉटेल्सचा इतका बजबजाट झालाय की जवळच वाहणाऱ्या लेह टोकपो (म्हणजे लेह नावाची छोटी नदी) चं पाणी पुरेनासं झालंय आणि चक्क बोरवेल्स टाकू टाकू भूजलाची पातळी सतत खाली खाली जाते आहे. बर प्रश्न इथेच संपत नाही.

सहा हजार खोल्या आहेत, सगळ्या हॉटेल्स, गेस्ट हाउस आणि होम स्टे मिळून. म्हणजे किमान तितके आधुनिक संडास. विडंबन बघा, आम लडाखी माणूस कोरडे (बिना पाण्याचे) संडास वापरतो मात्र आपल्या अतिथींकरितां आधुनिक संडास वापरून  पाणी वापरल्या जातं, ह्याचं त्याला भानही नाही. मग पाणी वापरणारा संडास आला, की त्या पाण्याच्या शुद्धीकरणाचा पण प्रश्न आला. जी गोष्ट पाण्याची, तीच इतर संसाधनांची. तिथली जमीन, तिथले कचऱ्याचे वाढते डोंगर, टुमदार लाकूड आणि मातीची घरे जाऊन सिमेंट-विटांची घरे, खाण्या-पिण्याच्या सवयी, सगळंच बदलत गेलं.

लडाख केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर

मागच्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी लडाखला केंद्र शासित प्रदेश घोषित केल्यावर तर परिस्थिती फार म्हणजे फार झपाट्यानी बदलते आहे. तिथे केंद्र शासनानी नवीन उद्योग सुरु करण्याचे मनसुबे रचलेत, बाहेरील मंडळींना तिथे जागा उपलब्ध करून देऊन, नवे रस्ते, नव्या पायाभूत सोयींची निर्मिती करण्याचे जाहीर केले आहे. शिवाय, अगदी या वर्षी, काही महिन्यांपूर्वी पूर्ण होऊन राष्ट्राला समर्पित झालेला अटल बोगदा यामुळे तर पर्यटक आणि लडाखेतर मंडळींचे आवागमन वाढणार.

अटल बोगाद्यामुळे एकीकडे प्रमाणाबाहेर पर्यटक यायची भीती असली तरी तिलाच उलटवून सोय म्हणून पाहिलं तर चार महिन्यात होणारी गर्दी आता वर्षभर वाटता येईल. स्विझर्लंड काय, स्कॅंडेनेवियन देश काय किंवा थंडीतली अमेरिका वा कॅनडा बघायला असंख्य भारतीय पर्यटक जातातच. मग, त्याच, किंवा तशाच पर्यटकांनी थंडीतले लडाख करायला काय हरकत आहे? दिवसा अगदी शून्या पर्यंत उतरणारे तापमान जानेवारी, फेब्रुवारीच्या रात्री हमखास उणे २५, उणे ३० पर्यंत जातं. शेजारच्या काश्मीरच्या बर्फात खेळायला जातात तसाच, किंबहुना त्याहून जास्ती बर्फात इथे खेळायला मिळेल.  

झंस्कार नदीवरचा ‘चादर ट्रेक’ extreme adventure आवडणाऱ्या अनेकांना खुणावतो. थंडीतल्या उणे ३० तापमानात अख्खी नदी गोठलेली असते, जिला चादर म्हणतात. त्यावरून चालत, रात्री तंबू त्याच गोठलेल्या नदीकिनारी लावून थांबायचं, असा तो जबरदस्त ट्रेक असतो. शिवाय तिथे असंख्य छोटे-मोठे पर्वत शिखर आहेत ज्यांना सर करणे हे अनेकांचे स्वप्नं असते. हेमिस अभयारण्य, काही शतके जुने  गोम्पा (लडाखी बौद्ध मंदिरे, एक नाही अनेक आकर्षणे आहेत जे सारे थंडीतही भेट देऊ शकतात.

लेह व्यतिरिक्त इतरही जागा 

लेह शहराजवळ आहे सेकमॉल शाळा. आणि त्याची संकल्पना आहे सोनम वांगचुक (ज्यांच्या आयुष्यावर बेतलेलं आहे ‘थ्री इडियट्स’ मधलं फुन्गसुक वाङ्गडू हे पात्र) यांची. त्यांनी लडाखच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड मोठं काम उभारून ठेवलंय. आणि आता त्याहून पुढे जाऊन त्यांनी शाश्वत विकासाची कास धरत स्थानिक युवकांसाठी रोजगार देईल असे शिक्षण सुरु केलंय. त्याकरता एक मोठं विश्वविद्यालय तिथे उभं राहतंय. ते पूर्ण होईल तेव्हा होईल, पण सध्या त्यांची शाळा बघायला आणि गेल्या ६-८ वर्षात त्यांनी केलेला एक भन्नाट प्रयोग बघायला हिवाळ्यातसुद्धा पर्यटक, अभ्यासक, संशोधक, पत्रकार लेहला भेट द्यायला लागलेत. Vertical glacier, म्हणजे मनुष्य निर्मित उभी हिमनदी म्हणता येईल, असं ‘आईस स्तूप’ हे संयुक्तिक नाव दिलेलं आहे, त्याची कल्पनेपासून प्रत्यक्षात येईपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांसोबत अंमलबजावणी करणारे वांगचुक लेह आणि आसपासच्या परिसराचं होणारे नुकसान बघून व्यथित होतात.

सोनम वांगचुक आणि त्यांच्या मागे अर्धवट बनलेले आईस स्तूप

केवळ चार महिने नको तर वर्षभर पर्यटक हवेत, हा तर विचार करण्याजोगा प्रश्न आहेच, पण सोबतच हा ही विचार हवा की एकट्या लेह शहरावर पूर्ण लडाखचा भार नको, असे वांगचुक सांगतात.

लडाखच्या अंतर्गत भागात कुठलेही गाव खरे तर पर्यटनाकरिता उत्कृष्ट. त्यासाठी सरकारनी रस्ते असतील हे बघितलं पाहिजे. लोकांनी आणि समाजसेवी संस्थांनी स्थानिक होम-स्टे वाढवून, तिथल्याच लोकांना गाईड म्हणून तयार करणे, इत्यादी.

कारण वेळ आली आहे आता लडाखी लोकांना ठरवावेच लागेल – मोजक्या चार महिन्यात पर्यटकांची भरमार आणि तेही जास्तीकरून लेह शहराच्या नैसर्गिक संसाधनांवर ताण देणारे पर्यटक हवेत की वर्षभर थोडे थोडे आणि तेही लडाखमध्ये सर्वत्र जाणारे पर्यटक हवेत? 

(हा लेख प्रथम ‘मैफिल दिवाळी अंक २०२०’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे)